अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रभु श्रीराम प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रभु श्रीरामांनी आपल्या आदर्श जीवन पध्दतीने सामान्य व्यक्तीने आपल्या परिवाराचा सांभाळ कसा करायचा याचा आदर्श घालून दिला. त्याच आदर्श आणि पवित्र तत्वावर भारतीय संस्कृती जिवंत असून ती पुढे अनेक शतके कायम राहिल, असा विश्वास अकोला सराफा असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश खरोटे यांनी व्यक्त केला.
बिर्ला राम मंदिर येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामरक्षा पठण सोहळ्यानिमित्त आयोजित भुमिपुजन कार्यक्रमात बोलत होते. निलेश देव मित्र मंडळाद्वारे आयोजित या कार्यक्रमात एक लाख वेळा रामरक्षा पठण होईल. या सोहळ्यात तीन ते चार हजार मातृशक्ती तसेच शाळकरी विद्यार्थीनी सामुहिकपणे रामरक्षा पठण करतील. त्या मंगल कार्यास येथे भुमीपुजन व राम मंदिरात श्रीराम पुजन करत विधिवत सुरुवात करण्यात आली.
यावेळी शैलेश खरोटे यांनी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर या वेळी माजी आमदार वसंतराव खोटरे यांनी अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळा आपण सर्व आपल्या आयुष्यात पाहू शकत आहोत, हे आपले सर्वांचे भाग्य असल्याचे सांगितले. या सोहळ्यात प्रत्येकाने सहभागी होण्याची गरज यावेळी खोटरे सरांनी व्यक्त केली. हरिश आलिमचंदानी यांनी या सोहळ्यास शुभेच्छा देत सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे रामवचन प्रभावी तसेच सामाजिक जीवनात कसे आदर्शतत्व आहे, याचा दाखला दिला. या भुमीपुजन सोहळ्याचे सुत्रसंचालन नाट्यकर्मी दिलीप देशपांडे यांनी केले. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामरक्षा पठण सोहळ्यास येताना मातृशक्तीने मौल्यवान वस्तु, दागिणे, महागडे मोबाईल हे सोबत आणु नये असे आयोजकांनी आवाहन केले.
यावेळी माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी नगराध्यक्ष हरिषभाई आलिमचंदाणी, नरेश बियाणी, सोनुबापू देशमुख,दिलीप देशपांडे, जयंत सरदेशपांडे,सातपुते, धर्मेंद्र देवपुजारी, राजू गुन्नलवार, राजू कनोजिया, रामहरी डांगे, अजय शास्त्री, विजय वाघ, उमाकांत मिश्रा, नरेंद्र परदेसी,रमेश खिलोसीया, मारवालजी,अन्ना सिरसकार,गणेश मैराळ, यादव,अविनाश सभापतीकर,शशिकांत कुळकर्णी,श्रीराम उमरेकर,नेने,भास्कर बैतवार, मंदिराचे पुजारीसह नागरिकांची उपस्थिती होती.