अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्राथमिक शिक्षणातील अक्षर ज्ञानासह विद्यार्थ्यांमधील आंतरीक कलागुणांना प्रोत्साहन व त्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. शैक्षणिक सत्रासोबत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन खरोखरच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन कृष्णा गोवर्धन शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
स्थानिक निमवाड़ी येथील मारवाड़ी ब्राह्मण संस्कृत विद्यालयतर्फे संचालित संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटचे वार्षिक स्नेह सम्मेलन नुकतेच थाटात पार पडले. स्नेहसंमेलनाचे औपचारिक उद्घाटन प्रमुख अतिथी कृष्णा गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलकिशोर हरीतवाल होते. व्यासपीठावर हरिप्रसाद शर्मा, अमर गौड, महेंद्र जोशी, कवीवर्य कृष्णकुमार शर्मा, राजेश सिवाल आणि मुख्याध्यापिका राधा वाडेगावकर विराजमान होते. सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करून स्वामी विवेकानंद व जिताऊ माता यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
वार्षिक स्नेह सम्मेलन आयोजित करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आंतरीक कलागुणांचा प्रसार आहे. या माध्यमातून जागरूकता निर्माण होते. संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये याकरिता केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद असून आपण यासाठी सर्वोतोपरी मदतीला सदैव तत्पर आहे, असे आश्वासन कृष्णा शर्मा यांनी या प्रसंगी दिले.
संस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आयोजित सर्व कार्यक्रम चित्रपटासारख्या वातावरणात घेण्यात आले. यामध्ये घुमर नृत्य, कव्वाली, भांगडा प्रस्तुत करून विद्यार्थ्यांनी मान्यवर व पालकांची मने जिंकली. मुख्याध्यापिका वाडेगावकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी आयोजन यशस्वीपणे करून घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शिक्षक सय्यद डबीर हुसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.