महायुतीमध्ये धुसफुस सुरु असून आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीला आमदार बच्चू कडू जाणार नाहीत. तर महायुतीच्या पत्रकार परिषदेसाठी काही तास आधी फोन केल्याने प्रहार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीला आमदार बच्चू कडू जाणार नाही. ग्रामपंचायत व नगरपंचायतला भाजपने निधी दिला नाही. भाजपला लोकसभा महत्त्वाची तर आम्हाला विधानसभा महत्त्वाची, तर आमच्याही मागण्या आहेत. त्या पूर्ण कराव्यात. वापरून घेण्याची भाषा भाजपने करू नये. 5 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यात भूमिका जाहीर करू, असा उघड पवित्रात बच्चू कडू यांनी भाजपविरोधात घेतला आहे.
मागील 4 वर्षात आम्हाला एकदाही प्रहार पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याचे जाणवले नाही. एकदाही प्रहारच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना महायुतीतील नेत्यांनी विचारात घेतले नाही किंबहुना संपर्क साधला नाही. कालच्या महायुतीच्या पत्रकार परिषदेचे नियोजन चार ते पाच दिवसांपूर्वी झाले असताना आम्हाला पत्रकार परिषदेच्या काही तास अगोदर फोन करण्यात आला, अशा शब्दांत प्रहार पक्षाचे भंडारा जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.आमचे नेते प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे महायुतीच्या पत्रकार परिषदेत जाण्याच्या कोणत्याही सूचना किंवा निर्देश देलेल नाहीत. त्यामुळे प्रहारने महायुतीच्या पत्रकार परिषदेला जाण्याचे टाळल्याचे वंजारी म्हणाले.