अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा चारही शंकराचार्यांनी विरोध केला, अशा बातम्या माध्यमात आल्यानंतर आता दोन शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, द्वारिकापीठ आणि शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तर पुरी गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनीही या सोहळ्याला पाठिंबा दिला आहे. मात्र ते आता सोहळ्यास उपस्थित राहणार नसून योग्य वेळी दर्शन घेण्यास येतील, अशी माहिती आलोक कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.
केवळ उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विरोधात भूमिका मांडली आहे. “बाकी तीनही शंकराचार्य हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे समर्थन करत आहेत. मात्र त्यांच्या भूमिकेचे चुकीचे आकलन माध्यमांनी केले”, असे आलोक कुमार यांनी सांगितले.शृंगेरी शारदा पीठाचे स्वामी भारतीकृष्ण तीर्थ आणि द्वारिकापीठाचे स्वामी सदानंद सरस्वती या दोन शंकराचार्यांनी सांगितले की, सनातन धर्माच्या अनुयायांसाठी हा आनंदाचा क्षण आहे.
शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनीही अशाच प्रकारचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. ते म्हणाले, शंकराचार्य हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विरोधात असल्याची विधाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी अशा प्रकारचे कुठलेही विधान केलेले नाही. धर्मविरोधी शत्रूंनी जाणूनबुजून हा कांगावा केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मी या सोहळ्याला शुभेच्छा देतो, असेही शंकराचार्यांनी म्हटले.
उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला होता. त्यात त्यांनी राम मंदिराचे काम पूर्ण झालेले नसल्यामुळे चारही मठाचे शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. “हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे चुकीचे आहे. मोदी मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. मग मी तिथे उपस्थित राहून काय करू? तिथे उभे राहून फक्त टाळ्या वाजवू का? अशी टीका त्यांनी केली होती.
विशेष म्हणजे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी २०१९ साली लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी येथून निवडणुकीला उभे राहिलेल्या राम राज्य परिषदेचे उमेदवार श्रीभगवान पाठक यांना पाठिंबा दिला होता. मात्र पाठक यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर त्यांनी निषेध आंदोलन करण्याचीही भूभिका घेतली होती.