नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान, राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला महिनाभरातच मोठा धक्का बसला आहे. एका उमेदवाराच्या निधनामुळे निवडणूक न झालेल्या करणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना भाजपाने या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र टीटी यांना काँग्रेसचे उमेदवार रूपिंदर सिंह कुनुर यांनी १२ हजार ५७० मतांनी पराभूत केले आहे.
या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुनूर यांचं निधन झाल्याने करणपूर येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राजस्थानमध्ये १९९ जागांसाठीच मतदान झालं होतं. तर करणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतंच मतदान झालं होतं. त्यात मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला आहे.