अकोला दिव्य न्युज ब्युरो : एकजूटता सर्वात मोठी शक्ती असून सांगून विदेशी आक्रमणकारी शक्तीला केवळ सनातन धर्माने हद्दपार केले. धर्म आणि स्वतःच्या व समाजाच्या कल्याणासाठी सदाचाराची कास धरा. आपल्या मुला मुलींना आपले चांगले मित्र बनवा, त्यांच्यात वितुष्टता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या, कुटुंबात सौख्य निर्माण होईल असे प्रयत्न करून प्रपंच व समाजाला सुखी करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन आपल्या आशीर्वाद रुपी मार्गदर्शनात साध्वी ध्यानमूर्ती महाराज यांनी केले. महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या दोन दिवसीय 26 व्या प्रांतीय अधिवेशनाच्या समापन प्रसंगी विशेष अतिथी साध्वी ध्यानमूर्ती महाराज यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमापूजन व जयघोषाने सांगता समारंभाचा प्रारंभ करण्यात आला.संमेलनाचे प्रांतीय अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी आपले अध्यक्षीय तर स्वागताध्यक्ष सुशील खोवाल यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. आयोजन समितीचे कार्याध्यक्ष रमाकांत खेतान यांनी सांगितले की १९७५ मध्ये स्व जमनलाल गोयनका यांनी अकोल्यात महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. आज समाजाच्या बदलत्या व्यवस्थेच्या संदर्भात या संमेलनाची उपयुक्तता खेतान यांनी स्पष्ट केली. माजी आमदार बबनराव चौधरी आणि माजी आ.गोपिकीसन बाजोरिया यांनी, संमेलनात महिलांची उपस्थिती वाखाणण्यासारखी असून युवकांनी कल्चर, कॉन्फिडन्स व कॉन्सन्ट्रेशन यावर भर देऊन सामाजिक विकास साधावा असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित विशेष अतिथी आचार्य वाघेश व मथुरा येथील संत हेमलता शास्त्री यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज जगाची विचित्र पद्धत झाल्याने शत्रुता निर्माण होऊ नये म्हणून भावनांचा परिपाक करा. पुढे जाणाऱ्याचे स्पर्धक न बनता सहयोगी बना. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकाल. कार्यक्रमाचे संचालन लदनिया तर आभारप्रदर्शन संमेलनचे महामंत्री कैलास अग्रवाल शिरपूर यांनी केले.
जल्लोषात झाला नवरत्न सन्मान सोहळा
सांगता समारंभात मानाचा व प्रतिष्ठेचा अग्रभूषण व अग्रश्री पुरस्कार सोहळा जल्लोषात संपन्न झाला. पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवी व उद्योजक पवनकुमार सराफ यांना मानाचा अग्रभूषण गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. तर अग्रश्री पुरस्कारांचे मानकरी महानगरातील युवा समाजसेवी शैलेंद्र कागलीवाल, ज्येष्ठ उद्योजक शिवप्रकाश रुहाटीया यांना प्रदान करण्यात आला. तसेच अग्रश्री पुरस्काराने बद्रीप्रसाद जगन्नाथ नागपूर, जालनाचे पन्नालाल बगडिया, अनिल कुमार अग्रवाल परतवाडा, डॉ सुरेश अग्रवाल जळगाव, गोपाल अग्रवाल आर्णी, गणेश अग्रवाल धुळे यांना सन्मानित करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात या नवरत्नांची परिसरात मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला.
माजी आ गोपिकीसन बाजोरिया यांच्या मार्गदर्शनात व संमेलनाचे प्रांतीय अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात मार्गदर्शक म्हणून वृंदावन येथील साध्वी ध्यानमूर्ती महाराज, मथुरा येथील संत हेमलता शास्त्री व प्रवचनकार आचार्य वाघेश उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ विप्लव बाजोरिया, माजी आ बबनराव चौधरी, संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत खेतान, आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष सुशील खोवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, कृष्णकुमार गोयल, नारायणदास अग्रवाल, गोपाल अग्रवाल, निरंजन अग्रवाल, डॉ सुशील भारुका, महामंत्री कैलास अग्रवाल, कोषाध्यक्ष अनिल अग्रवाल, मंत्री संतोष झुनझुनवाला, युवा अध्यक्ष अभिषेक अग्रवाल, महिला अध्यक्ष मालती गुप्ता, समन्वयक किरण अग्रवाल, प्रांतीय अधिवेशन समन्वयक रामनिवास गुप्ता, संघटन मंत्री कमलकिशोर अग्रवाल, शैलेंद्र कागलीवाल,आनंद भारुका, सुनील सिंघानिया, शिवगोपाल भरतीया, संदीप चौधरी, रतनलाल अग्रवाल,भरत अग्रवाल, प्रदीप मेहादिया, जनता बँकेचे अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग, शितलकुमार अग्रवाल, गिरीश अग्रवाल, वसंत बाछुका, अँड. सुरेश अग्रवाल गुरुजी, महिला शाखेच्या महामंत्री उषा अग्रवाल, लता खिरवाल, महिला मंडळाच्या संतोष केडिया, यश अग्रवाल उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सफलतेसाठी महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचे समस्त प्रांतीय व जिल्हाध्यक्ष दीपक गोयनका व त्यांच्या संपूर्ण कार्यकारणी सदस्य, अग्रवाल समिती, अग्रवाल नवयुवक मंडळ, महिला मंडळाने परिश्रम घेतले.