अबकारी घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीनवेळा नोटीस बजावली होती. तरीही केजरीवाल ईडीसमोर चौकशीला हजर न झाल्याने आता ईडी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आपच्या नेत्यांनी ईडी आज केजरीवालांना अटक करू शकते, असा दावा केला आहे.
ईडीने आपल्यावर जे आरोप केले आहेत, त्यावरील प्रश्न लिखित स्वरुपात द्यावेत असे पत्र केजरीवाल यांनी काल तिसऱ्या समन्सला ईडीला दिले आहे. तसेच ईडीची नोटीस बेकादेशीर असल्याचा दावा आपने केला आहे. ईडी केजरीवालांच्या घरी छापा मारू शकते किंवा त्यांना अटक करू शकते असा दावा आपच्या नेत्या मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी केला आहे.
आज अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकला जाईल आणि त्यांना अटकही केली जाईल, अशी माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. समन्स पाठवण्याची वेळ आणि त्यांना अटक करण्याचा प्लॅन हे लोकसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा आरोप आतिशी यांनी केला आहे. आजपर्यंत एक रुपयाही रोख, सोने, चांदी किंवा कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. गेल्या वर्षभरापासून तपास सुरु आहे. मग तीन आठवड्यांत तीन समन्स पाठविण्याची एवढी काय घाई झाली, असा सवालही आतिशी यांनी केला आहे.
केजरीवाल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहेत, पण ईडीने त्यांना का बोलावले आहे ते सांगावे. साक्षीदार, आरोपी, दिल्लीचे मुख्यमंत्री किंवा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक म्हणून संबोधत आहे. लोकसभा निवडणुकीचा टायमिंग साधूनच एवढी घाईला आले आहेत, असे त्या म्हणाल्या.