अकोला दिव्य न्युज ब्युरो : महागाईचा ससेमिरा सर्वसामान्यांची पाठ सोडायला तयार नाही. कांद्याचे वाढलेले भाव डोळ्यात पाणी येतं होते, तेच आता लसणाच्या महागाईचा ठसका लागला आहे. लसणाचे भाव ४०० रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचले आहेत.
गावरान लसूण तर आता पाहायलाच मिळत नाहीये. त्यामुळे महिलांनीही स्वयंपाकात लसणाचा वापर मर्यादित केला आहे. आधीच महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आता लसूण घेताना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. आणखी दोन महिने तरी लसणाचे भाव कमी होणे शक्य नसल्याचे चित्र आहे.
आवक कमी, भाव वाढले
लसणाची आवक सध्या मार्केटमध्ये कमी झाली आहे. वातावरणातील बदलामुळे मागील सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी झाली असल्याने आता लसूण मिळणे कठीण झाले आहे.मागील वर्षी लसणाचे उत्पन्न कमी राहिले व यंदा गारपिटीने देखील लसणाचे क्षेत्र घटले आहे.
त्यामुळे मुळातच उत्पादन कमी असल्याने लसणाच्या भावात दिवसेदिवस वाढ होत असून घाऊक बाजारात चांगल्या दर्जाचा लसूण ३५० रुपये तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४०० रुपये असा भाव सध्या लसूण घेत आहे. आवक वाढणार की नाही? यंदा लसणाची लागवड कमी असून मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने लसूण उत्पन्न कमी झाले आहे. जुनालसूणही जास्त शिल्लक नाही.नवीन लसूण मार्केटमध्ये येण्यासाठी अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाईल. त्यामुळे आवक वाढण्यास साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल यात शंका नाही. त्यामुळे सध्या तरी भाव कमी होतील अशी आशा नाही.
लसणाचे दर का वाढले ?
प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका लसणालाही बसला आहे. मान्सून चांगला बरसला नाही. त्याने लसणाचे पीक कमी झाले. तर दुसरीकडे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणांवरील लसणाचे पीक उद्ध्वस्त झाले.परिणामी आवक घटली. दोन महिन्यापूर्वी लसणाचा दर किलोमागे १२० ते १४० रुपये इतका होता. मागील महिन्यात लसणाला प्रति क्विंटल १९ हजार रुपये भाव असल्याने भाजी मंडईत येता येता लसूण २२० ते २४० रुपये प्रति किलो झाला होता.आता हाच दर ४०० रुपयांवर गेला. सध्या बाजारात मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातून लसूण विक्रीला येत आहे. लसणाचे वाढलेले दर अजून दीड ते दोन महिने राहतील अशी माहिती लसूण व्यापारी देत आहे.