अकोला दिव्य न्युज ब्युरो : कुस्तीपटू बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने म्हटलं आहे की,
मला आशा आहे की, तुमची प्रकृती ठीक असेल. तुम्ही देशाच्या सेवेमध्ये व्यस्त असणार. तुमच्या व्यस्ततेदरम्यान मी आपलं लक्ष कुस्तीकडे वळवू इच्छितो. आपल्याला माहितच आहे की, यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले, तेव्हा मीही त्यात सहभागी झालो होतो.
सरकारने आंदोलकर्त्यांना ठोस आश्वासन दिल्यानंतर जानेवारी महिन्यातच कुस्तीपटू आपापल्या घरी निघून गेले. मात्र तीन महिन्यानंतरही ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआरही दाखल झाला नव्हता.एप्रिल महिन्यात कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलन केलं. तरही बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी कुस्तीपटूंना न्यायालयात जाऊन गुन्हा दाखल करावा लागला. जानेवारीमध्ये तक्रारदार महिलांची संख्या १९ होती, जी एप्रिल महिना येईपर्यंत सात राहिली. म्हणजे केवळ तीन महिन्यात बृजभूषण सिंहने आपल्या ताकदीच्या जोरावर १२ महिलांना न्याय मिळण्यापासून अडवले. आमचे आंदोलन ४० दिवस चालले या ४० दिवसांत आणखी एक महिला मागे हटली. आमच्यावर खूप दबाव टाकला गेला.
आंदोलन करू नये म्हणून दिल्लीच्या बाहेर काढण्यात आले.आम्ही आमची पदकं गंगा नदीत वाहण्याचा निर्णय घेतला. आम्ही गंगा तटावर गेलो. परंतु, तिथे आम्हाला आमच्या प्रशिक्षकांनी आणि शेतकरी नेत्यांनी अडवलं. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आमचं बोलणं झालं. त्यांनी आम्हाला महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. त्याचबरोबर कुस्ती महासंघातून बृजभूषण सिंह आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना, त्याचबरोबर त्यांच्या साथीदारांना बाहेर करू असं आश्वासनही दिलं होतं. परंतु, तसं काहीच झालं नाही.
आता २१ डिसेंबर रोजी ब्रिजभूषण पुन्हा एकदा सत्तेत आले आणि त्यांनी, आपले वर्चस्व आहे आणि कायमच राहील असे विधान केले. आम्ही सर्वांनी रडत रात्र काढली. कुठे जावे, काय करावे समजत नव्हते. सरकार व लोकांनी खूप आदर दिला. या आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावं का?’ अशी भावना पुनियाने या पत्रात व्यक्त केली.