अकोला दिव्य न्युज ब्युरो : वाशिम येथील कापड व्यावसायिकाची अकोला रेल्वे स्थानकावर १७ लाख रूपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात अकोला येथील रेल्वे पोलिसांनी टोळीतील एकाला वाशिम येथून अटक केली आहे. २० लाख रूपयांमध्ये ५०० च्या ४० लाख रूपयांच्या हुबेहुब, पण नकली नोटा देऊन बाजारात चलनात आणण्याचे आमिष दाखवून तीन जणांच्या टोळीने ही फसवणूक केली.
वाशिम येथील नगर परिषद चौकात राहणारे दर्शन हुकूमचंद डहाळे(३७) यांच्या तक्रारीनुसार आरोपी रोहित किशोर काळे(२५) रा. नगर परिषद चौक वाशिम याने त्यांना ५०० रूपयांच्या खऱ्या नोटांसारख्या दिसणाऱ्या हुबेहुब नकली नोटा देवराव उर्फ देवा भाऊराव हिवराळे रा. चितोडा ता. खामगाव यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीकडून मिळवून देतो. तसेच २० लाखांत ४० लाखांच्या त्या नोटा बाजारात चलनात आणण्याचे आमिष दाखविले आणि दर्शन डहाळे यांना १७ डिसेंबर रोजी दुपारी अकोला रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक दोनवर पैसे घेऊन बोलावले.
दर्शन डहाळे हे १७ लाख रूपये घेऊन आल्यावर आरोपी रोहित किशोर काळे याने त्यांच्याकडून पैशांची बॅग घेऊन लवकरच नकली ५०० रूपयांच्या ४० लाखांच्या नोटा देण्याचे सांगितले आणि तो बॅग घेऊन पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, दर्शन डहाळे यांनी अकोल्यातील रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा रेल्वे पोलिसांनी तपास करून वाशिमच्या रेल्वे स्टेशनवरून १९ डिसेंबर रोजी रोहित काळे याला अटक केली. त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
५ लाख रूपये दिले सहकाऱ्याला :
आरोपी रोहित काळे याची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने १७ लाख रूपयांपैकी ५ लाख देवा उर्फ देवराव हिवराळे रा. चितोडा याला दिले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी देवा उर्फ देवराव हिवराळे याच्याविरूद्ध मुंबई, शेगावसह राज्यातील इतर पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी रोहित काळे याची चौकशी करण्यात येत असून, या चौकशीतून आणखी काही फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास रेल्वे पोलिस स्टेशनच्या ठाणेदार अर्चना गाढवे करीत आहेत.