अकोला दिव्य न्युज ब्युरो : दरवर्षी वाढती चारा टंचाई आणि वाढत्या किंमतीमुळे ‘गो-पालन’ मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे.मात्र सर्वच समाजातील सेवाभावी आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून स्थापना करण्यात आलेल्या अकोला जिल्ह्यातील म्हैसपुर येथील ‘आदर्श गोसेवा आणि अनुसंधान प्रकल्प’ कडून प्रकल्पातील गायींच्या पालन पोषणाचे कार्य सुरळीतपणे पार पाडले जात आहे आणि यामध्ये अधिकाधिक गो- भक्तांचा सहभाग होण्यासाठी यंदा मकरसंक्रांतीच्या पर्वावर “श्री रामदेव जीवन लिला” या महानाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.
पश्चिम विदर्भातील ख्यातनाम ‘आदर्श गोसेवा आणि अनुसंधान प्रकल्पातील गायींच्या चा-याचे प्रबंधन करण्यासाठी याच संस्थेने आयोजित केलेल्या या महानाट्याचे सादरीकरण ‘ओ रामसा’ ग्रुपकडून प्रस्तुत केल्या जाणाऱ्या श्री रामदेव जीवन लिला महानाट्याची निर्मिती व संकल्पना सुनील नावंदर यांची आहे. मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या विशाल आवारात शनिवार २३ डिसेंबरला सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणार असलेल्या महानाट्याच्या वेळी बाबा रामदेव यांचे १७ व्या पिढीतील राजस्थान येथील रुणीचा निवासी हनुमान सिंह तंवर यांचे सानिध्य लाभणार आहे.
राजस्थानमधील रुणीचा धाम येथील ‘श्री बाबा रामदेव’:यांच्या जीवन चरित्र्यावर आधारित या महानाट्यातील १२५ कलावंतांकडून संगीतमय सादरीकरण करण्यात येणार आहे. मकरसंक्रांतीच्या मंगलमय पर्वात आयोजित महानाट्याचा आणि गोमातेच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी गोभक्त, गोसेवक आणि राजराजेश्वर नगर व पंचक्रोशीतील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, गायींच्या चा-यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.