अकोला दिव्य न्युज ब्युरो : काँग्रेसच्या लोकसभेच्या पाच खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. सभागृहात अनियमित वर्तन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या निलंबनासाठी प्रस्ताव मांडला होता.काँग्रेसचे खासदार टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांनी काल संसदेत घडलेल्या घटनेवरुन गोंधळ घातला. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी या पाच खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तृणमृल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना देखील राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
संसदेत काल घडलेल्या घटनेवरुन दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. संसदेतील सुरक्षेतील त्रुटींवरून विरोधक सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत. आज विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज देखील दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
दरम्यान, संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संसद परिसरात मोठा पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची सुरक्षा दल कसून तपासणी करत आहे. इतकेच नाही तर बुधवारी लोकसभा सचिवालयाने खासदारांना नवीन इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची ‘स्मार्ट कार्ड’ तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा आणि राज्यसभा लॉबी आणि संसदेच्या संकुलातील इतर काही ठिकाणी फेशियल रेकग्निशन सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आली. सचिवालयाने म्हटले आहे की, अनेक सदस्यांकडे स्मार्ट कार्ड आहेत, ज्यांनी व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टमसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती करून घ्यावी. याशिवाय पुढील आदेश येईपर्यंत व्हिजिटर पास बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. संसदेच्या आत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. टोपी व बूट काढून तपासणी केली जात आहे.