Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीACB जाळ्यात जळगाव जामोद न.पा मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक अडकले

ACB जाळ्यात जळगाव जामोद न.पा मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक अडकले

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पथदिव्यांच्या देखभाल व दुरूस्ती कामाच्या देयकाचा धनादेश देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना जळगाव (जामोद) नगर पालिकेचे मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ओढले गेले. लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. लाचखोर आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. नंतर सर्वकाही सामान्य झाले.

जळगाव (जामोद) शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी जळगाव जामोद येथील एका संस्थेला कंत्राट देण्यात आला आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत पथदिव्यांच्या देखभाल व दुरूस्ती कामाचे देयक तसेच तक्रारदाराने स्वतः केलेल्या कामाचे देयक सादर केले होते. कामाचे देयक अदा करण्यासाठी संबंधितांनी १२ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा खाजगी कंत्राटदार यांनी तक्रारकर्ता होऊन बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे सदर तक्रार दाखल केली. मुख्याधिकारी डोईफोडेसाठी 6 हजार रुपये आणि स्वतः साठी 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये लाचेची मागणी शेळकेने केली. त्यासंबंधी डोईफोडेची पडताळणी केली असता, त्यांनी लाच रक्कम स्विकारण्यास संमती देवून लाच रक्कम देण्यास सांगितले. त्यावरून सापळा लावण्यात आला होता.


विद्युत पर्यवेक्षक दिपक कैलास शेळकेला (30) लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. दोन्ही आरोपीना ताब्यात घेत, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली.पोलिस उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे, पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पोलिस निरीक्षक महेश भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सापळा पथक सहायक फौजदार शाम भांगे, पोहेकॉ. विलास साखरे, प्रवीण बैरागी, रवी दळवी, पो ना जगदीश पवार,विनोद लोखंडे, पोकाॅ शैलेश सोनवणे, म.पो.कॉ. स्वाती वाणी आणि चालक पोना नितीन शेटे, पोकाॅ अरशद शेख यांनी ही कारवाई पार पाडली.

अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधिक्षक मारुती जगताप,अपर पोलीस अधिक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभाग, बुलडाणा येथे 96570 66455‌ या क्रमाकावर संपर्क साधावा. असे आवाहन पोलिस उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे यांनी केले आहे. टोल फ्री क्रमांक – 106

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!