अकोला दिव्य न्युज ब्युरो : भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साय यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे. आज भाजपाच्या बैठकीत साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ३ डिसेंबर रोजी चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यात भाजपाने तीन राज्यात बहुमताने विजय मिळविला. तरीही तीनही राज्यातील मुख्यमंत्री निवडण्यासाठी उशीर होत होता. अखेर सात दिवसांनी छत्तीसगडला नवा मुख्यमंत्री मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. रमण सिंह यांना आता भाजपाने बाजूला केल्याचे स्पष्ट होत आहे.
९० विधानसभा मतदारसंघ असलेल्या छत्तीसगड राज्यात भाजपाने ५४ ठिकाणी विजय मिळविला. आज भाजपाचे सर्व आमदार, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सरबनंदा सोनावाल आणि पक्षाचे महासरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांच्यात झालेल्या बैठकीनंतर साय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ओम माथूर, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय आणि सह प्रभारी नितीन नबीनही बैठकीला उपस्थित होते.
कोण आहेत विष्णू देव साय?
५९ वर्षीय आदिवासी नेते विष्णू देव साय यांनी कुनकुरी (अनुसूचित जमातीसाठी राखीव) विधानसभा मतदारसघातून विजय मिळविला. त्यांनी दोन टर्म छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले आहे. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात ते केंद्रात मंत्री होते. तथापि, २०१९ साली त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली गेली नाही. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपाचा मोठा पराभव झाला होता. भाजपाचे केवळ १५ आमदार निवडून आले. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने अनेकांचे तिकीट कापून नव्या नेत्यांना संधी दिली होती.
जशपूर जिल्ह्यातील एका आदिवासी गावात २१ फेब्रुवारी १९६४ रोजी विष्णू देव साय यांचा जन्म झाला. संयुक्त मध्य प्रदेशमध्ये त्यांनी १९९० ते १९९८ पर्यंत आमदारकी भूषविली. त्यानंतर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग चार टर्म ते खासदार राहिले.
छत्तीसगडमध्ये आदिवासी मुख्यमंत्री नेमण्याचे राजकारण
राज्यातील ९० पैकी २९ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. २०१८ च्या निवडणुकीत यातील २५ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. राज्यात ३२ टक्के आदिवासी मतदार आहेत. आदिवासींच्या नाराजीमुळे २०१८ साली भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा पक्षाने आदिवासी पट्ट्यात दोन परिवर्तन यात्रा काढल्या. याखेरीज बस्तरमध्ये निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दौरे झाले. बस्तर विभागात १२ जागा येतात. येथे भाजपने मोठे यश मिळवले. याखेरीज रायपूर परिसरातील शहरी जागा भाजपने जिंकत बघेल यांना धक्का दिला.