अकोला दिव्य न्युज ब्युरो : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तीन दिवस झाले, तरी भाजपने जिंकलेल्या तीन राज्यांमध्ये अद्याप मुख्यमंत्रिपदाच्या नावावर सहमती झालेली नाही. त्यातच राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही मोठ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धेत असलेल्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.
जयपूरमध्ये सोमवारी ७०हून अधिक आमदारांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. गाठीभेठीचा सिलसिला मंगळवारीही सुरू होता. हे एकप्रकारे वसुंधरा राजेंचे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षाच्या संसदीय मंडळाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असे भाजपचे प्रभारी अरुण सिंह यांनी सांगितले. ‘आतापर्यंत ७० आमदारांनी त्यांची भेट घेतली आहे. वसुंधरा राजे जेथे गेल्या तेथे भाजपचा विजय झाला. वसुंधरा या सर्वमान्य नेत्या आहेत,’ असा दावा त्यांचे समर्थक कालीचरण सराफ यांनी केला.
केंद्रीय मंत्र्यांसह राजस्थानात अनेक स्पर्धेतवसुंधरा राजे यांच्याशिवाय राजस्थानमध्ये ज्येष्ठ नेते ओमप्रकाश माथूर, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, दिया कुमारी, प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, बाबा बालकनाथ आणि डॉ. किरोडीलाल मीना हे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
एकेकाळचे मित्र झाले प्रतिस्पर्धी
मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांचे तरुणपणातील जिवलग मित्र कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांच्या ‘लाडली बहना’मुळे भाजप सत्तेत आल्याचा दावा फेटाळला. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता कशी मिळाली, असे त्यांनी इंदूरमध्ये म्हटले.
छत्तीसगडमध्ये महिला मुख्यमंत्री?
यंदा छत्तीसगडला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह यांचे नाव चर्चेत आहे. भरतपूर सोनहत मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांच्याशिवाय माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह, प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांचीही नावे चर्चेत आहेत.
मध्य प्रदेशात कोण शर्यतीत?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्रसिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल हे या पदासाठी इतर दावेदार आहेत; परंतु, कोणीही ते शर्यतीत असल्याचे मान्य केले नाही. त्यासह कैलाश विजयवर्गीय हेही स्पर्धेत आघाडीवर आहेत.