गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : शीर्षक वाचून चकित झालात ना? एकतर केसांच्या विक्रीचा व्यवसाय आणि तेही अकोला शहरात ! हे नक्की आहे तरी काय ? नेमका असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे खरे आहे. केसांपासून मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. जगभरातून मानवी केसांना खूप मागणी असून जगात सर्वत्र केस विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. महत्वाची गोष्ट ही की भारतही ह्या व्यवसायात आघाडीवर आहे. करोनानंतर जेथे मोठमोठे व्यवसाय डबघाईला आले तेथे ह्या केसांच्या विक्रीच्या व्यवसायाला मात्र चांगली मागणी असून, भरपूर किमतीला केस विकले जातात. आपल्यासाठी महत्त्वाची बाब ही आहे की, भारतीय केसांना जगभरातून मोठी मागणी आहे. त्यामुळे महिनाभर नियमित उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो.
अकोला शहरातील मंगलदास मार्केट भागात केसांची खरेदीचे दुकान असून, अकोला शहरातील विविध भागात फिरुन, गल्ली बोळात आवाज देऊन अनेक जण १५० ते २०० रुपये छटाक (५० ग्रॉम) भावनेने खरेदी केलेल्या केसांची येथील दुकानदाराला विक्री केली जाते. विशेषतः केस विंचरल्यानंतर निघणारा केसांचा गुंता महिला फेकून न देता सांभाळून ठेवतात आणि या लोकांना विकतात.केसांच्या प्रतवारीनुसार त्यांची किंमत ठरते आणि चांगल्या प्रतीच्या केसांना भरपूर रकमेचा परतावा देखील मिळतो. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरुन महिलांच्या केसांचा गुंता विकत घेतला जाते. विशेष म्हणजे महिलांच्या ‘ब्युटी पॉर्लर’ मधून मोठ्या प्रमाणात केस कर्तन होते आणि ७ हजार रुपये किलो दराने या केसांची खरेदी केल्या जाते.
अशा प्रकारच्या नैसर्गिक केसांचा विग बनवण्यासाठी किंवा हेयर transplant साठी उपयोग होतो. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामुळे ज्या रुग्णांचे केस गेले आहेत त्यांना या केसांचा खूप फायदा होतो. तसेच डोक्यावरील केस विरळ असणाऱ्या लोकांना देखील या केसांचा फायदा होतो. महत्त्वाची बाब ही आहे की, भारतीय केसांना जगभरातून मोठी मागणी आहे. त्यामुळे दर महिना नियमित उत्पन्नाच्या दृष्टीने हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो.
नेमका कसा असतो हा केसांच्या विक्रीचा व्यवसाय ?
भारतीय लोकांचे केस निसर्गतः काळे, दाट आणि मजबूत असतात. त्यामुळे या केसांना सगळीकडे भरपूर मागणी असून अतिशय चांगली रक्कम देखील मिळते. भारत देशातून दर वर्षी जवळ जवळ ४० लाख डॉलर इतक्या किमतीचे केस विदेशात एक्सपोर्ट केले जातात. वेगवेगळ्या गाव आणि शहरांमध्ये तसेच तिरुपती सारख्या देवस्थानातून जिथे केस देवाला अर्पण केले जातात तेथून मोठ्या प्रमाणावर केस गोळा केले जातात आणि त्यांची विक्री केली जाते.