अकोला दिव्य न्युज ब्युरो : तेलंगणामध्ये सत्तेचे दरवाजे उघडतायत हे पाहून काँग्रेसने सावध भूमिका घ्यायला सुरुवात केलीय. गोव्यात जे झाले ते तेलंगणात नको व्हायला म्हणून काँग्रेसने आपल्या उमेदवारांना सावध राहण्याच्या आणि आमिषाला बळी न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. निकालाला अवघे काही तास राहिलेले असताना बीआरएसकडून उमेदवारांशी संपर्क साधला जात असल्याचे काँग्रेसला वाटत आहे. यामुळे कर्नाटकातील संकटमोचक डी के शिवकुमार यांना तातडीने तेलांगणाला पाठविण्यात आले आहे.
छत्तीसगडच्या विजयी उमेदवारांना ४ डिसेंबरला कर्नाटकमध्ये हलविले जाणार आहे. अशातच तेलंगणामध्ये देखील उमेदवार फोडण्याची कुणकुण लागल्याने काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. डीके शिवकुमार यांनीच शनिवारी निवडणूक निकालांमुळे मी तेलंगणाला जात असल्याचे म्हटले आहे. मला पक्षाने जे काम दिले आहे ते पूर्ण करणार आहे, असे पत्रकारांना सांगितले आहे.
काँग्रेसच्या आमदारांना इतर पक्षांकडून संपर्क केला जात आहे का आणि पक्षाला या फुटीची भीती वाटत आहे का, असा प्रश्न शिवकुमार यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी पक्षातील कोणताही आमदार इतर राजकीय पक्षांमध्ये सामील होणार नाही. इतर राजकीय पक्षांकडून आमच्या उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे. आमच्या उमेदवारांनी त्यांना कोणी संपर्क केला त्याची माहिती दिली आहे. यामुळे आम्ही सावध झालो आहोत, असे शिवकुमार म्हणाले.
बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन आहे. परंतू, मला त्यापासून १० दिवस लांब रहावे लागणार आहे. आमच्या राज्याच्या निवडणुकीवेळी शेजारील राज्यातील नेत्यांनी मदत केली होती. त्यांच्यावेळी आम्ही मदत केली. त्यामुळे शेजारील राज्याच्या निवडणुकीच्या वेळी आमच्यावर जबाबदारी असेल, असे शिवकुमार म्हणाले.