गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : राज्यात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना, बीडचे तत्कालीन भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून केलेल्या आत्महत्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून बियाणी यांच्या आत्महत्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे तेव्हा संपूर्ण माहेश्वरी समाज आणि मारवाडी समाजात रोष निर्माण होत आहे.जवळपास 14 महिन्यांपुर्वी घडलेल्या या घटनेच्या तपासात नेमके काय निष्पन्न झाले, हे उघडकीस होऊन, या प्रकरणी सीबीआय चौकशी करून, ‘दूध का दूध और पानी का पानी’ व्हावे. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे बियाणी हे स्व. गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर प्रितमा व पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक होते.
बीडचे रहिवासी व भाजपचे बीड महानगर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी 10ऑक्टोबर 2022 रोजी आपल्या राहत्या घरीच स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांना लगेच शहरातील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. घटनेनंतर झालेल्या चर्चेत, बियाणी यांनी दबाव असह्य होऊन आत्महत्या केली, असेही सूर उमटत होते.पोलिसांनी प्रकरण चौकशीत घेतले.पण आज जवळपास 14 महिन्यानंतरही भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे.
दरम्यान, आज ठाण्यातील एक आक्रमक नेता अशी ओळख असलेले व शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर भगीरथ बियाणीने कुणामुळे आत्महत्या केली असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळलं, त्यामुळे भगीरथ बियाणीनं आत्महत्या केली की नाही ? असा आरोप आव्हाडांनी केला.
२००२ पासून बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरू झाली त्यामागे आहे कोण? आम्हालाही बोलता येते. मी कोणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादी कुणी लागू नका.असं सांगताना आव्हाड यांनी बियाणींच्या आत्महत्या संदर्भात केलेली विधाने अत्यंत गंभीर आहेत. ही सरळसरळ आत्महत्या नव्हे तर आत्महत्या करण्यासाठी भगीरथ बियाणी यांना मजबूर केले गेले होते, असं आव्हाड यांच्या वक्तव्यांनी स्पष्ट झाले आहे. तेव्हा भगीरथ बियाणी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मारवाडी समाजाने पुढाकार घेणे काळाची गरज आहे.