अकोला- गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहरामध्ये पाऊस पडत आहे. शिवाय वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. त्यामुळे शहरातील एकंदरीत परिस्थिती पाहता या पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात आजारांचे थैमान निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आजारांचे थैमान व रोगराई थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी निलेश देव मित्र मंडळाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचलेले आहेत. रस्त्यांवर, रस्त्यांच्या बाजूला, खुल्या भूखंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच रस्त्यांवर चिखल निर्माण होऊन अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढलेली आहे. नाल्या तुंबलेल्या असल्याने पावसाचे पाणी वाहून गेले नाही. परिणामी नालीतील घाण पाणी रस्त्यावरून अनेक ठिकाणी वाहिले. त्यामुळे दुर्गंधी पसरून परिसरातील वातावरण खराब झालेले आहे. काही ठिकाणी नाल्या खोदून ठेवलेल्या आहेत, त्या ठिकाणी तर पाणीही वाहून गेले नाही आणि खोदून ठेवलेली माती पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पसरल्याने मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. या कचऱ्यावर पावसाचे पाणी पडून हा कचरा सडून त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व डासांची निर्मिती होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता अवकाळी पावसामुळे शहरात येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात डासांच्या प्रादुर्भावामुळे व दुर्गंधीमुळे अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात आजारांचे थैमान व रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून शहरात स्वच्छता व साफसफाई बाबत काळजी घ्यावी, डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागात औषध फवारणी, धूर फवारणी करावी, तुंबलेल्या नाल्या दररोज मोकळ्या करण्यात याव्या, अशा मागण्या निलेश देव यांनी महापालिका आयुक्तांकडे केले आहेत.