अकोला दिव्य न्युज ब्युरो : तेल्हारा तालुक्यातील सिरसोली गावात जवळपास २२३ वर्षांपूर्वी मराठ्यांनी इंग्रजांना पराभूत केले होते. इंग्रजांचे नजरेत हिरो ठरलेला कॅप्टन केन यांच्यासह शेकडो सैनिक येथे मारल्या गेले होते. याच युद्धात मराठा सेनापती करताजी पाटील जायले यांचेसह अनेकांना वीरगती प्राप्त झाली होती. या झुंजार लढाईचा इतिहास भारतीयच काय दस्तुरखुद्द अकोला जिल्हावासीही विसरले. परंतु इंग्लंड व ऑस्ट्रेलिया येथील संशोधक पथकाने सिरसोलीला भेट दिल्याने, इंग्रज अद्यापही विसरले नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
तेल्हारा तालुक्यातील सिरसोली नजीक पांढरी या स्थळावर ता. २९ नोव्हेंबर १८०३ रोजी मराठा व इंग्रजात झुंजार लढाई झाली होती. मराठा सरदार दौलत शिंदे व रघुजी भोसले यांच्या सैन्याने लॉर्ड ऑर्थर व्हेलसली आणि स्टीव्हिन्सन यांच्या सैन्यासोबत सात दिवस झुंज दिली होती. यामध्ये मराठ्यांचे सेनापती संत वासुदेव महाराज यांचे पंजोबा कर्ताजी पाटील जायले यांचेसह शेकडो मराठा सैनिकांना येथे वीरगती प्राप्त झाली होती, तर ब्रिटिशांचे नजरेत हिरो ठरलेला लॉर्ड वेलस्लीचे कार्यकाळातील कॅप्टन केन हा देखील या ठिकाणी मारल्या गेला होता. इंग्रजांनी कॅप्टन केनच्या स्मृतीत पांढरी येथे समाधी बांधली होती.आज रोजी ती समाधी अस्तित्वात राहिली नाही.
गत काही वर्षापर्यंत ते थळगे व्यवस्थित होते. या थळग्याचे दर्शन घेण्याकरता दरवर्षी या ठिकाणी कॅप्टन केनचे नातेवाईक तथा ब्रिटिश आर्मीतील सेवानिवृत्त अधिकारी व इतिहास संशोधक असा मोठा ताफा येथे येतो. त्यांच्याकडे सर्व सचित्र नकाशे उपलब्ध असतात. तसेच भारतातील अनेक लेखकांची पुस्तके सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असतात.इंग्लंड व ऑस्ट्रेलिया येथील इतिहास संशोधकांमध्ये ब्रिटिश आर्मीचे सेवानिवृत्त मेजर जनरल मिस्टर गार्डन कोरियन यांचे नेतृत्वात जवळपास १२ वयोवृद्ध महिला व पुरुष यांनी सिरसोली गावासह युद्ध स्थळाची संपूर्ण माहिती कॅमेरा बंद केली व हे पथक निघून गेले.
भारतीय संशोधक फिरकलेही नाहीत. मात्र सातासमुद्रापलीकडून विदेशी संशोधक या ठिकाणी दरवर्षी येतात. त्यांनी येथील सर्व माहिती गोळा करून आपल्या देशात डॉक्युमेंटरी बनवल्या. परंतु, आजपर्यंत एकही भारतीय इतिहास संशोधक या ठिकाणी आला नाही किंवा आतापर्यंत मराठ्यांच्या युद्ध इतिहासाला उजाळा मिळाला म्हणून कोणत्याच प्रकारचे प्रयत्न झालेले नाहीत. हीच भारतीयांसाठी खरी शोकांतिका म्हणावी लागेल. सिरसोली ग्रामस्थांनी या स्थळाचा विकास व्हावा म्हणून सर्व प्रयत्न केले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मात्र, दरवर्षी येथील स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालयाचे विद्यार्थी तथा अकोली जहागीर येथील जायले परिवार छोटेखानी कार्यक्रम घेत असतात.