अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर शहरातील धरमपेठ मधील एका बहुचर्चित पब मध्ये एंट्रीच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर गुन्हेगाराच्या एका टोळक्याने जोरदार राडा केला. यावेळी एका आरोपीने पिस्तूलही काढल्याची जोरदार चर्चा आहे. काल शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर धरमपेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ मध्ये आजूबाजूला दोन पब आहेत. येथे सॅटर्डे नाईटला मोठी रक्कम घेऊन तरुण-तरुणींना इंट्री दिली जाते. तेथे मद्यपान आणि अन्य प्रोग्राम होतात. उच्चभ्रू तरुण तरुणी येथे येत असल्याने गुन्हेगारांचीही त्यांच्यावर नजर असते.
सॅटर्डे नाईटला असाच प्रकार झाला. शनिवार रात्री 11 ते 11:30 च्या सुमारास एक टोळके रास्ता मध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेथे बाचाबाची शिवीगाळ झाल्यानंतर बाजूच्या पब मध्ये हे टोळके आले. तिथेही एन्ट्री नाकारल्याच्या कारणावरून त्यांच्यासोबत पब संचालक आणि पाहून बाऊन्सरचा जोरदार वाद झाला. त्यानंतर या टोळीतील आरोपींनी आपल्या काही गुंड साथीदारांना बोलवून घेतले.
जोरदार हाणामारीनंतर त्या ठिकाणी यावेळी पिस्तुल काढण्याचीही चर्चा होती. दरम्यान, या प्रकारामुळे पब मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. तरुणींची आरडा ओरड धावपळ सुरू झाल्यानंतर कोणीतरी माहिती दिल्यावरून अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काहीना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले. ही माहिती कळताच दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात साथीदार पोहोचल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
या संबंधाने अंबाझरी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तक्रार मिळाल्यानंतर पोलिस कारवाईचे स्वरूप ठरविणार आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली.