गजानन सोमाणी : व्यक्तीकडे ज्ञान असेल तर भौतिक सुखे उपलब्ध होऊ शकतात पण ज्ञानाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही. व्यक्तीकडे असलेले ज्ञान कोणीही चोरू शकत नाही, त्यामुळे ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ आहे. भौतिक सुविधांच्या बाबतीत रडगाणे न करता समाधानी रहावं आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तर,…तर गुणवंत व्यक्ती निश्चितच परिस्थितीवर मात करू शकतो, हे अकोला शहरातील शिल्पा दीपक मेश्रामने सिद्ध केले.
शिल्पा मेश्रामने स्वतःसोबत पती दीपक आणि मेश्राम कुटुंबासह अकोला शहराचे नावलौकीक केले आहे. अभ्यासासाठी सुविधांच्या अभावांचा पाढा वाचणा-यांसाठी शिल्पा मेश्रामचे यश हे झणझणीत अंजन घालणारे आहे.
भारतासह विदेशात लोकप्रिय आणि ज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करणारे ‘कौन बनेगा करोडपती’ या ज्ञानाच्या माध्यमातून अर्थार्जन करून देणा-या कार्यक्रमात काल शुक्रवार १७ नोव्हेंबरला शिल्पा मेश्राम या अकोल्यातील सर्वसाधारण भगिनींने आपल्या बुध्दी कौशल्याचा बळावर तब्बल १२ लाख ५० रुपये प्राप्त केले. विशेष म्हणजे ३ लाख २० हजार रुपये जिंकले, तेव्हा तीनही ‘लाईफ लाईन’ कायम होत्या. यासोबतच सुपर संदूक मधील १० पैकी ९ प्रश्नांची उत्तरे देऊन ९० हजार रुपये जिंकले. तदनंतर साडेसहा लाख रुपयांचा प्रश्नावर १ आणि साडेबारा लाख रुपयांचा प्रश्नावर दोन लाईफ लाईन वापरून शिल्पा मेश्रामने तब्बल साडेबारा लाख रुपयांची कमाई केली.
शहरातील अशोक नगर भागात राहणाऱ्या शिल्पा मेश्राम हीचे पती आटोचालक असून, त्यांना ७ आणि ५ वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. आटो व्यवसायातून महिन्याला जेमतेम ७ ते ८ हजार रुपयांची कमाई करतात. यामधून आटोसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यावर हातात ५-६ हजार रुपये शिल्लक राहतात. चीजवस्तू आणि कपडे ठेवण्यासाठी घरात एक साधे कपाट नाही. घराच्या आतील भिंतीला प्लॅस्टर नाही आणि जमीनीवर फरशी बसविलेली नाही.अशा परिस्थितीत संसाराचा गाडा खेचणारी शिल्पा मात्र अत्यंत समाधानी असल्याचे, तीच्या बोलण्यातून जाणवत होते. या स्वभावासाठी अमिताभ बच्चन यांनी देखील तीन वेळा तीची प्रशंसा केली.
परिस्थितीची जाण, उच्च ध्येय आणि त्यासाठी नेटाने परिश्रम करण्याची जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून केबीसीत प्रवेश तर मिळवलाच पण फास्टर फस्टच्या प्रश्नाचे अवघ्या ४२.३ सेंकदाला उत्तर देत, शिल्पा हाटसीटवर विराजमान झाली. विशेष म्हणजे हा प्रश्न अत्यंत कठीण असताना तिने सर्वात अगोदर उत्तर देत, आपल्या बुध्दीची चुणूक दाखवली होती. शेवटी एकच खरं की, ज्ञानाच्या धनासमोर सर्व गौण आहे. तर ज्ञानाच्या माध्यमातून अर्थार्जनासोबत नावलौकिकही होतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.