गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अकोला गावात जिल्हा कचेरी, तहसील कचेरी, मुन्सीपल कमिटी, पोलिस दल आणि न्यायालय सुरु करुन इंग्रजांन या माध्यमातून शहराचा विकास सुरु केला. इंग्रजांच्या राज्य-व्यवस्थेचा ढाचा तयार होत असतांना, दुसरीकडे कधीही न बघितलेल्या व्यवस्था देखील शहरात सुरू होत होत होत्या. इंग्लडमधील स्थानिक प्रशासकीय व्यवस्था अकोला येथे स्थिरावत होती.
अकोला गावात पोस्टाने पत्र येत होते. मात्र नियमितपणे ते मिळत नव्हते. इंग्रजांनी पोस्ट कार्य व्यवस्थामध्ये मोठ्या सुविधा आणल्या. अकोला येथे पोस्ट ऑफिसचे कार्य ५ डिसेंबर १८६८ पर्यंत मुंबई प्रांतच्या पोस्ट विभागअंतर्गत सुरु होते. मात्र ६ डिसेंबर १८६८ रोजी मध्यप्रांत पोस्ट ऑफिस अंतर्गत अकोला येथील पोस्ट ऑफिस सहभागी करण्यात आले आणि दुसऱ्याच वर्षी अर्थात १८६९ मध्ये मुख्य डाक घरच्या इमारतीचे निर्माण करण्यात आले. (आज त्याला हेड पोस्ट ऑफिस म्हटल्या जाते.) १ जुलै १८८१ पर्यंत मध्यप्रांत पोस्ट विभागाच्या वर्धा विभागांतर्गत अकोला पोस्ट ऑफिसचे कार्य सुरु होते. त्यानंतर त्याला बेरार विभाग अंतर्गत सहभागी करण्यात आले. १८६८ पर्यंत येथे केवळ दोन पोस्टमॅन होते. वर्ष १८७३ पर्यंत मनीऑर्डरसाठी सरकार येथे एक एजंट नियुक्त करीत होते. त्याला मनीऑर्डरवर कमिशन मिळत होते. वर्ष १८७३ मध्ये सरकारकडून एजंटची नियुक्ती रद्द करुन ते कार्य डाक विभागाकडे सोपविण्यात आले.
वर्ष १९२० पर्यंत अकोला जिल्ह्यात पत्र इत्यादी पोहोचविण्याच्या जबाबदारीचा कंत्राट मुंबई येथील पेस्टनजी अॅन्ड कंपनीला मिळाला होता. येथे त्यांचे एक दुकान होते. जे अकोल्यात ‘पेस्टनजी की चाल’ नावाने प्रसिद्ध होते. पेस्टनजी अॅन्ड कंपनी अकोला ते हिंगोलीपर्यंत डाक ने-आण करण्याचे काम करीत होती. डाकची वाहतूक करण्यासाठी कंपनीने काही घोडागाड्या तयार केल्या होत्या. या घोडागाडीच्या माध्यमातून डाक शिवाय प्रवाशांची सुद्धा ने-आण केल्या जात होती. कंपनीने ८- १० कोस नंतर एक ‘छोटा तबेला’ तयार केला होता. ज्यामध्ये घोडे बदलल्या जात होते. मोटरबस सुरु झाल्यानंतर या घोडागाडीचे चलन बंद झाले आणि डाक ने-आण करण्याचे काम मोटारबसमधून केल्या जाऊ लागले.
पोस्ट ऑफिस नंतर इंग्रजांनी तार ही नवीन व्यवस्था सुरु केली. तार हा विषय येथील लोकांसाठी संपूर्णपणे नवीन बाब होती. अकोला येथे तार सेवा सुरु करुन, १७ नोव्हेंबर १८६८ ला तार ऑफिसचे उद्घाटन झाले आणि टिक टिक करुन पाठविल्या जाणारी पहिली तार नागपूर तार ऑफिसला करण्यात आली. या तारमध्ये अकोला येथे तार ऑफिस सुरु झाल्याची सुचना देण्यात आली. तार ऑफिसचे पहिले अधिकारी श्री. वाल्टन होते. त्यावेळी तारघरमध्ये केवळ ३ तारबाबू होते.
पोस्ट आणि तार या नवीन सुविधांच्या माध्यमातून नातेवाईकांसोबत संवाद करण्याचे नवीन माध्यम उपलब्ध झाल्यामुळे पोस्ट आणि तार कार्यालयात सकाळपासूनच गर्दी राहत होती. मुख्य डाक घरात होणारी गर्दी बघता मुख्य डाकघराची अजून एक शाखा उघडण्यात आली. (ती म्हणजे आजचे ताजनापेठ डाकघर आहे.) डाकघर व तारघरचे अधिकारी वाल्टन यांच्यासाठी मुख्य डाकघरच्या मागे डाक बंगला बांधण्यात आला. जरा कल्पना करा की, त्यावेळी टिक टिकने येणारी व जाणारी तार अकोला शहराच्या व्यवसायाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे माध्यम होते.