अकोला दिव्य न्युज ब्युरो : गत १८ वर्षांपासून अकोला शहरातील एक अवलिया गोरगरीब, वंचित, उपेक्षित जणांची दिवाळी साजरी करीत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संकलित झालेल्या रद्दीच्या विक्रीतून मिळालेले पैसे व काही दात्यांच्या सहकार्याने स्वराज फाउंडेशनचे पुरुषोत्तम शिंदे यांनी गरजूंना नवे कपडे व फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. पुरुषोत्तम शिंदे यांनी वंचितांची दिवाळी साजरी करण्याचा ध्यास घेतला असून, गत १८ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवीत आहेत.
स्वराज फाउंडेशनच्या हाकेस ओ देऊन अकोलेकरांनी सात रद्दी संकलन केंद्रांवर रद्दी जमा केली. दिवाळीपर्यंत तब्बल ५००० किलो रद्दी संकलित झाली. ही रद्दी विकून मिळालेल्या पैशांतून साडी, लुगडे, धोतर व लहान मुलांचे कपडे खरेदी केले.तसेच काही सेवाभावी संस्था आणि व्यक्तींच्या सहकार्याने दिवाळीचा फराळ व कपडे खरेदी करून ते गरजूंना वितरित करण्यात आले.
स्वराज फाउंडेशनने रद्दी विकून मिळालेल्या पैशांतून साडी, लुगडे, धोतर व लहान मुलांचे कपडे खरेदी केले. सलग तीन दिवस शहरातील विविध भागांत जाऊन गोरगरीब व गरजूंना या कपड्यांचे वितरण करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसोबत दिवाळीच्या आदल्या दिवशी जठारपेठ भागातील गजानन महाराज मंदिर परिसर, मोठी उमरी स्मशानभूमीमागचा परिसर, सातव चौक, जिल्हा स्त्री-रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय परिसर, अनिकट, गरजूंना कपडे व फराळाचे वितरण करण्यात आले.
लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. पुरुषोत्तम शिंदे यांना या कामात संदीप दाभाडे, शंतनू शिंदे, अक्षय खाडे, सचिन व स्वप्निल यांचे सहकार्य लाभले.तसेच जवळपास ७० किलो फराळाचे वितरणही करण्यात आले. या माध्यमातून तब्बल ५५० उपेक्षितांची दिवाळी गोड झाली.