अकोला दिव्य न्युज ब्युरो : ज्येष्ठ व्यक्तींनी जीवनात आनंदी राहण्यासाठी सतत क्रियाशील व उद्यमशील राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल वसंत कुमार खंडेलवाल यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघ अकोलाद्वारे आयोजित वर्धापन दिन व ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी होते. मंचावर प्रमुख अतिथी उद्योजक वसंत कुमार खंडेलवाल फेस्कॉमचे अतिरिक्त मुख्य सचिव विनायक पांडे, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष नारायण अंधारे, संघाचे उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार, सचिव प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि निशा कुलकर्णी आणि सुमन शहा यांच्या प्रार्थना गायनाने झाला.
प्रास्ताविकात सचिव सत्यनारायण बाहेती यांनी वर्षभरात जेष्ठ नागरिक संघा द्वारे आयोजित करण्यात आलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांची कार्यक्रमांची माहिती दिली. यानंतर २०२३ या वर्षात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
त्यामध्ये बाबासाहेब उटांगळे ज्येष्ठ भूषण पुरस्कार चौथमल सारडा यांना तर स्व नटवर भाई चौधरी पुरस्कृत इलाबेन चौधरी स्मृती प्रित्यर्थ अकोला जिल्हा सेवाभावी जेष्ठ नागरिक कार्यकर्ता पुरस्कार नायणराव अंधारे यांना, नाना इंगळे पुरस्कृत मातोश्री स्वर्गीय मुक्ताबाई इंगळे स्मृती प्रित्यर्थ अकोला जिल्हा सेवाभावी महिला कार्यकर्ता पुरस्कार श्रीमती सुशीलादेवी कृष्ण गोपाल गांधी यांना, ज्येष्ठ नागरिक संघ अकोला पुरस्कृत उत्कृष्ट पुरुष कार्यकर्ता पुरस्कार प्रभाकरराव देशपांडे तर सत्तर वर्षावरील नियमित सायकल चालविणारे ज्येष्ठ नागरिक स्व कृष्णकांत तारकस स्मृति पुरस्कार गोविंद गोलांडे तर उत्कृष्ट महिला कार्यकर्ता पुरस्कार श्रीमती स्वप्ना देशपांडे तर मु. ज. निर्बाण पुरस्कृत स्वर्गीय जय किशन निर्बाण स्मृती जेष्ठ पिताश्री पुरस्कार शंकरलाल चांडक यांना तर शैलजा फडके पुरस्कृत संघाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्ता पुरस्कार डॉ.सौ.पद्मजा महाजन यांना तर आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र सेवा श्री पुरस्कार सूर्योदय बालगृह संस्था अकोला यांना आणि ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे पुरस्कृत सर्वात जास्त सभासद करणारा कार्यकर्ता पुरस्कार प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात या वर्षात ज्या सदस्यांना 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा सभासदांचा कुमकुम तिलक लावून आणि औक्षण करून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. चौथमल सारडा आणि श्रीमती सदावर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी वसंतकुमार खंडेलवाल यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करुन जेष्ठ नागरिक संघाद्वारे करण्यात येत असलेल्या समाज उपयोगी कार्याबद्दल आनंद व्यक्त करून या कार्यात नेहमी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी उपस्थित असलेल्या जेष्ठ बंधू भगिनीं प्रति कृतज्ञता व्यक्त करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
अतिथींचा परिचय उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार, कार्यक्रमाचे संचालन सचिव बाहेती आणि प्रकाश जोशी तर मानपत्र वाचन प्रभाकर देशपांडे व आभार प्रदर्शन सहसचिव प्रमोद देशमुख यांनी केले.
या प्रसंगी आमदार स्व लालाजी उर्फ गोवर्धन शर्मा आणि संघाच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संध्या संगवई आणि शरयू देशपांडे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणिकराव मानकर, नेमिनाथ इंदाने सुनील खोत, कन्हैया भरत, संगीता इंगळे आदींनी सहकार्य केले. संघाच्या आजी-माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह पुरस्कार प्राप्त परिवारांचे सदस्य महिला आणि पुरुष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.