गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : प्रदूषणाचा कहर वाढत असल्यामुळे न्यायालयाने दिवाळीच्या काळात तीनच तास फटाके वाजवायला परवानगी दिली आहे. पण फटाक्यांची दुकाने सजली आहेत. त्यांची जोमाने खरेदी विक्री सुरू आहे. श्वासोच्छवास धोकादायक वातावरण निर्माण झाले असताना, त्यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.पण हिंदूंच्या सणालाच खोडा का घातला जातो? असा बिनबुडाचा मॅसेज समाजमाध्यात प्रसारित करुन ‘प्रदुषण गेल चुलीत’ बिनधास्त फोडा फटाके, असं प्रोत्साहन दिले जात आहे.
फटाक्यांची दुकाने अगदी गल्लोगल्ली दिसत आहेत. फटाक्यांच्या विक्रीच्या माध्यमातून हंगामी उत्पन्न मिळत असले तरी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे समाजाचे नुकसान होते, त्याचे काय, असा व्यापक विचार होताना दिसत नाही. फटाके विक्रेता कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे, हे कळण्यासाठी काही ठिकाणी फटाक्यांच्या स्टॉल्सवर राजकीय पक्षांचे बॅनर लावले जातात. ते यंदाही दिसत आहेत.
फटाके विक्रीतून चार लोकांना मिळणारा नफा महत्त्वाचा मानायचा की त्यातून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे निसर्ग आणि पर्यायाने समाजाची होणारी हानी अधिक गांभीर्याने घ्यायची ? पण ‘कोण कुठला समाज. आम्ही फक्त आमचाच विचार करतो. नाहीतरी प्रत्येक जण तेच करतो. मग आम्ही फटाके विक्रीच्या माध्यमातून चार पैसे मिळवले तर कोणाच्या पोटात का दुखावे ?रोजच्या गरजांच्या पूर्तीसाठी म्हणा किंवा अन्य खर्चाच्या अनुषंगाने आवश्यक असलेले पैसे कोणी खिरापत म्हणून वाटत नसते. त्यामुळे प्रदूषण वगैरेचे उपदेश आम्ही मानत नाही’, असा विचार रूढ झाला आहे.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी सर्वाधिक फटाके वाजवले जातात. दिवाळीच्या अन्य दिवसांतही हमखास ते वाजतच असतात. अमुक हजार रुपयांचे फटाके आणले आहेत, याचे भूषण वाटणारे महाभागही आहेत. एका बाजूला लक्ष्मी देवीची विधीवत पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी देवतेचे स्वागत फटाक्यांचा कचरा आणि धूर करून करायचे, ही विसंगती न वाटता तसे न करणाऱ्यांची टिंगल केली जाते. फटाके विक्रेता, फटाके वाजवणारे आणि ते न वाजवणारे असे सर्वच जण याच निसर्गातून मिळत असलेल्या प्राणवायूवर जिवंत आहेत. पण त्या निसर्गाची चिंता केवळ फटाके न वाजवणाऱ्या मंडळींना असते आणि यांनाच मूर्खात काढले जात आहे.
फटाक्यांवर कायमची बंदी आणण्याचा विचार कधी होईल का, याचे उत्तर नाही असेच वाटते. प्रदूषणामुळे श्वास कोंडत आहे. पण तरीही फटाक्यांवर बंदी आणायचा सरकार पातळीवर विचारही होत नाही, याचे खरच आश्चर्य वाटते. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी फटाके बंदी येणे अशक्य वाटते. कारण निसर्गाकडे गांभीर्याने पाहण्याचा व्यापक विचार करण्याची कुवत दिसत नाही. दोन – चार वृक्ष लावताना फोटो काढले की झाले निसर्गाचे संवर्धन, असे करून निसर्ग जपता येत नाही. याची कल्पना असूनही औपचारिकतेला पर्याय नाही, असेच वागले जाते.
फटाके वाजवण्यासाठी ठरावीक वेळ घालून दिली तरी त्याचे कोणीही पालन करत नाही. कारण फटाके वाजवणाऱ्या लोकांचा आणि वेळेचा दुरान्वयेही संबंध नसतो. फटाके वाजवण्याची वेळ ठरवणे ही एक औपचारिकता आहे. फटाके वाजवा पण ठराविक वेळेत, अशी भूमिका घेतली तर फटाके बंदीची डाळ शिजणे अशक्यच !
देशाच्या विविध भागांत वायू प्रदूषण वेगाने पसरत आहे. राजधानीतील प्रदूषणाची घातक पातळी लक्षात घेता कित्येक वर्षे या काळात शाळांना सुट्टी द्यावी लागत आहे. तरीही पालथ्या घड्यावर पाणीच असे म्हणता येईल. कारण प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यावर तात्पुरते जागे होतात. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांवर प्रदूषणाची दाट छाया आहे. देशातील प्रमुख महानगरे आणि शहरांची विदारक स्थिती आहे. बेसुमारपणे वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या अन्न पदार्थविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीत रासायनिक खतांचा उपयोग होतो. त्यामुळे अन्नात कसदारपणा नाही. परिणामी माणसाची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने अनेक आजारांनी त्याला घेरले आहे. प्रदूषित वातावरणात पिकत असलेले धान्य कसे असणार, हे सुज्ञास सांगणे न लागे.