अकोला दिव्य न्युज ब्युरो : यंदा धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी अत्यंत शुभ हस्त नक्षत्रात साजरी केली जाणार आहे. हस्त नक्षत्राचा अधिपती ग्रह चंद्र आहे. त्यामुळे यंदाची धनत्रयोदशी आर्थिक आणि राजकीय अशांतता, अस्वस्थता, संवेदनशीलता, करुणा, उग्रता, प्रेम, दया आणि कला यांचा समावेशात साजरी होणार आहे.
उद्या शुक्रवार १० नोव्हेंबरला द्वादशी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील आणि त्यानंतर तेरस तिथी सुरू होईल. हस्तनक्षत्र १० नोव्हेंबर रोजी दिवसभर राहील. सायंकाळी ५ वाजून २ मिनिटापर्यंत विश्वकुंभ योग तयार होणार असून त्यानंतर पृथ्वी योग होणार आहे. उद्या तिथी ११ नोव्हेंबरला आहे. पण धन त्रयोदशी १० नोव्हेंबरलाच साजरी होईल. हस्त नक्षत्रातील लक्ष्मी-कुबेर पूजेचा आर्थिक स्थैर्यावर विचित्र प्रभाव पडेल, तर नजीकच्या भविष्यात विचित्र आर्थिक आणि राजकीय परिस्थितीही पाहायला मिळेल.
राहुकाल सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत राहील. धनत्रयोदशीच्या दिवशी वृषभ लग्न राशीत कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करणे चांगले राहील. भगवान धन्वंतरी यांना हिंदू धर्मात देव वैद्य ही पदवी आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी धन्वंतरी पूजा अमृत चौघडिया, लाभ चौघडिया, धनु राशी किंवा कुंभ लग्न राशीत करावी.
लक्ष्मी नेहमी हिशोबाच्या खात्यात वास करते. धनत्रयोदशीला ग्रंथ खरेदी करून त्याची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. हिशोबाचे पुस्तक, चोपडा म्हणजेच हिशेब लिहिण्यासाठीचे पुस्तक खरेदी शुभ चौघडियातच करावी. धन त्रयोदशीच्या दिवशी चांदीची खरेदी हे शुभकारक आहे.या दिवशी खरेदी केलेल्या चांदीचे मूल्य नऊ पटीने वाढते. वृषभ राशीत सोने, चांदी आणि इतर धातूंची खरेदी करावी. शुभ-चौघडिया, उद्वेग-चौघडिया आणि कुंभ लग्नादरम्यान मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरी आणणे शुभ आहे.
धनत्रयोदशीला शुभ चौघडिया: या वेळेत खरेदी करने शुभ ठरेल.
चर चौघडिया- सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत.
लाभ चौघडिया– सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत.
अमृत चौघडिया- सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत.
शुभ चौघडिया- दुपारी 12 ते 1.30 पर्यंत
चर चौघडिया– सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत.
लाभ चौघडिया- रात्री ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत.