अकोला दिव्य न्युज ब्यूरो : एक दिवसीय विश्व कप स्पर्धेच्या इतिहासात थरारक लढतींपैकी एक अशी अफगाणीस्तान व आस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने एक हाती नव्हे तर एका पायावर ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ‘जखमी’ ग्लेन मॅक्सवेलच्या झुंजीने ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे.
ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज ९१ धावांवर माघारी परतले होते आणि समोर २९२ धावांचे लक्ष्य होते. तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन हे अशक्यच होते. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता, हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल याची शक्यता फक्त ११ टक्के लोकांनाच होती. पण, ग्लेन मॅक्सवेलचे वादळ घोंगावले.. तू फक्त उभा राहा असा मॅसेज त्याने पॅट कमिन्सला दिला आणि या पठ्ठ्याने दुसऱ्या बाजूने प्रहार केला. मांडीचे स्नायू ताणल्यामुळे मॅक्सवेलला पळताही येत नव्हते, तरीही तो मैदानावर उभा राहिला. त्याने एका पायावर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देताना द्विशतक झळकावले.
वेगवान गोलंदाज नवीन उल हकने त्याच्या पहिल्या दोन षटकांत ट्रॅव्हीस हेड ( ०) व मिचेल मार्शला ( २४) माघारी पाठवले. अझमतुल्लाह ओमारजाईने सलग दोन चेंडूंवर डेव्हिड वॉर्नर ( १८) आणि जॉश इंग्लिसला बाद केले. मार्नस लाबुशेन ( १४ ) रन आऊट झाला. मार्कस स्टॉयनिस ( ६) व मिचेल स्टार्क ( ३) हे राशीद खानचे शिकार ठरले. विजयासाठी २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाद ९१ धावांत तंबूत परतले. पण, ग्लेन मॅक्सवेल लढला. त्याने ७६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह शतक झळकावले.
मॅक्सवेलने आठव्या विकेटसाठी कर्णधार पॅट कमिन्ससाठी ९३ चेंडूंत शतकी भागिदारी पूर्ण केली आणि त्या कमिन्सचा वाटा फक्त ८ धावांचा होता. वर्ल्ड कपमधील हे मॅक्सवेलचे तिसरे शतक ठरले आणि त्याने मॅथ्यू हेडन व आरोन फिंच यांच्याशी बरोबरी केली. ही जोडी फिरकीपटूंना जुमानत नव्हती आणि नवीन व अनुभवी मोहम्मद नबी यांना गोलंदाजीसाठी बोलावले गेले. मॅक्सवेल जखमी होत आणि त्याला पळायलाही जमत नव्हते, तरीही तो मैदानावर उभा राहिला. ३३ धावांवर त्याची कॅच सोडने अफगाणिस्तानला महागात पडले. मॅक्सवेल २४ चेंडूंत २१ असा सामना खेचून आणला. त्याने मुजीब उर रहमानने टाकलेल्या ४७ व्या षटकात ६,६,४,६ असे फटके मारून मॅच संपवली.
मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स जोडीने १७० चेंडूंत २०२ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि त्यात कमिन्सच्या केवळ १२ धावा राहिल्या. मॅक्सवेलने १२८ चेंडूंत २१ चौकार व १० षटकारांच्या मदतीने नाबाद २०१ धावा केल्या.