अकोला दिव्य न्युज ब्युरो : राजराजेश्वर नगरीच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात भर घालणारे आणि लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील मंदिरातील श्री साईबाबा यांच्या प्रतिमेची हुबेहूब प्रतिकृती असलेल्या मुर्तीची सहकार नगरातील गजानन महाराज मंदिरातील नवनिर्मित मंदिरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत विधीवत पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गोरक्षण रोडवरील हरिश अश्विनी कॉलनी, सहकार नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणातील भव्य दिव्य नवनिर्मित मंदिरामध्ये श्री साईबाबांच्या नुतन मूर्तीचा “प्राणप्रतिष्ठा” सोहळ्याचा प्रारंभ १ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. श्री साई संस्थान शिर्डी येथील सेवानिवृत्त पुजारी रमेश जोशी व त्यांचे सहकारी यांच्या पौरोहीत्त्यात हभप गुरुवर्य मोतीराम महाराज (कळंबेश्वर) यांच्या हस्ते प्रायश्चित्त, पंचांगकर्म, कुटीर होम, मूर्तीस जलाधिवास
वास्तु, योगिनी, क्षेत्रपाल, प्रधान वारुण, स्थापन, पूजन, सायंपूजन आरतीने करण्यात आला.
तदनंतर भव्य शोभायात्रा काढून शांतीपाठ, स्थापित देवता प्रातः पूजन प्रधान हवन, प्रासाद प्रवेश, प्रासाद पूजन महास्नपन, महान्यास, शय्या, धान्य, निद्रा इत्यादी धार्मिक सोपस्कार पार पाडण्यात आले.
शहरातील ख्यातनाम धन्वंतरी व साईभक्त डॉ. आर.बी. हेडा आणि उषा हेडा दाम्पत्याच्या हस्ते शुक्रवार ३ नोव्हेंबरला हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रातः पूजन, पिंडीका पूजन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, महाअभिषेक, महापूजा, पूर्णाहुती, महाआरती करण्यात आली. यानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्रीला प्रा. निरज लांडे आणि मनीष हुडेकर यांनी
श्री साई संध्या कार्यक्रम सादर केला.
अकोला शहरातील साईभक्तांना या नवनिर्मित मंदिरामध्ये साक्षात शिर्डी येथील मंदिरातील साईबाबांच्या मुर्तीचे दर्शन घेतल्याचाच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ही मुर्ती मनमोहक अशी आहे.जवळपास ३ दिवसांपर्यंत चाललेला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ व व्यवस्थापन समीती सदस्यांनी परिश्रम घेतले.