अकोला दिव्य न्युज ब्युरो : कॉग्रेस पक्षाच्या बालेकिल्ला भुईकोट उध्वस्त करून, सतत ३० वर्षांपर्यंत अपराजित जनप्रतिनिधी आणि अकोलेकरांचा हक्काचा व ह्र्दयात वसलेले आमदार ‘लालाजी’ यांना जड अंतःकरणाने आज दुपारी शेवटचा निरोप दिला जात आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंत सर्वांशी जिव्हाळ्याचा संबंध व संकटसमयी धावून येणा-या लालाजींना कर्करोगाने आपल्या जाळ्यात ओढले. पण मोठ्या हिमतीने त्यांनी एक वर्षापर्यंत लढा दिला. नियतीने मात्र आपला डाव साधला अन् काल त्यांची जीवनयात्रा संपली.
सत्तेचा दास होण्यापेक्षा आमदार शर्मा यांनी सामान्य माणसाचं दास्यत्व पत्कारुन, महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं वेगळेपण सिद्ध केले. तब्बल सहा वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने, सुतगिरण्या, दुध संघ अशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थांच्या बळावर आमदार सातत्याने निवडून येत असतात पण शर्मा यांच्वया जवळ अशा संस्थांचे कोणतेही पाठबळ नव्हते. केवळ लोकांच्या ह्रदयात स्थान प्राप्त करून त्यांनी हे दुर्मिळ यश प्राप्त केले होते. त्यांचा संपर्क अतिशय दांडगा होता. अनेकांच्या चुलीपर्यंत त्यांचा वावर होता. प्रत्येकाच्या सुखदुःखात त्यांची उपस्थिती ठरलेली होती. मंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांना लाल दिव्याच्या गाडीचा कधी मोह झाला नाही.
एखाद्या रस्त्याचे उद्घाटन करावयाचे असल्यास ते त्याच भागातील एखाद्या व्यक्तीच्या हस्ते करवून घेत असत. प्रत्येक कार्यक्रमात व्यासपीठावरच स्थान मिळाले पाहिजे असा त्यांचा आग्रह नसे. फक्त मतदारसंघातील लोकांचीच कामे केली पाहिजे असे बंधन त्यांनी कधी घातले नाही. अन्य मतदारसंघातील लोकांची कामे देखील ते करीत असत. एकदा तर जिल्ह्याबाहेरील एका गावातील बाजारपेठ आगीत भस्मसात झाली. आ. गोवर्धन शर्मा यांनी त्या गावात जाऊन तेथील व्यापार्यांना मदत केली होती. या बाबींचा भाजपला फायदाच होत असे. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कार्याची सुरुवात केली होती. कोणाचेही काम करतांना त्यांनी जात, धर्म अथवा पक्ष असा कधीही भेद केला नाही. आ. गोवर्धन शर्मा यांच्या विषयी एक ग्रंथ निर्माण होईल इतके लिहिता येऊ शकते.
अकोला जिल्हा भाजपमय करण्यात सिंहांचा वाटा असलेल्या गोवर्धन शर्मांवर क्रुर काळाने घातलेल्या घाल्यात केवळ शर्मा कुटुंब, राजस्थानी समाजच नव्हें तर सर्वच समाजाचा आधारवड कोसळला आहे.त्यांच्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, आज शनिवारी आमदार शर्मा यांचा आळशी प्लॉट येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी शेवटचा निरोप घेऊन, दुपारी 2 वाजता तेथून अंतीम यात्रा काढण्यात येणार आहे.
आळशी प्लॉट येथून ही अंतिम यात्रा खंडेलवाल भवन, अशोक वाटीका, बसस्टँड, टॉवर चौक, कश्मीर लॉज, भाजप कार्यालय, महानगरपालीका चौक, सिटी कोतवाली, जयहिंद चौक, श्री विठ्ठल मंदिर, श्रीवास्तव चौक, डाबकी रोड, रेल्वे गेट आणि येथून श्री अन्नपुर्णा माता मंदिर जवळील स्व.मांगीलाल शर्मा महाविद्यालयाच्या मैदानावर पोहचेल. याठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.