अकोला दिव्य न्युज ब्यूरो : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार झटका लागणार आहे? सत्ताधारी पक्ष आगामी निवडणुकीत मागे पडणार आहे? या प्रश्नांची उत्तरे निवडणुकीपूर्वी आलेल्या एका सर्व्हेच्या रिपोर्टमधून समोर आलीत. या सर्व्हेने राजकीय पक्षाची झोप उडाली आहे. झी न्यूज आणि सी फोर सर्व्हेने या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त फायदा होईल तर भाजपाला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे.
सर्व्हेनुसार, काँग्रेस राज्यात मोठा पक्ष बनेल. राज्यात १७ नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. त्याआधी आलेल्या या सर्व्हेने भाजपा नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. मध्य प्रदेशात एकूण २३० जागा आहेत. पुढील महिन्यात १७ तारखेला या जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकीत काँग्रेसला बंपर लॉटरी लागेल. काँग्रेसला जवळपास १३२ ते १४६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला ८४ ते ९८ जागांवर समाधान मानावे लागू शकते तर इतरांच्या खात्यात ५ जागा जातील असं सर्व्हेतून दिसून येते.
मतदान टक्केवारीत काँग्रेसला ४६ तर भाजपाला ४३ टक्के मते
मध्य प्रदेश निवडणूक सर्व्हेत मतदानाची टक्केवारी काँग्रेसच्या दिशेने झुकताना दिसते. काँग्रेसला ४६ टक्के तर सत्ताधारी भाजपाला ४३ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. तर अपक्ष आणि इतर पक्षांना ११ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत यंदा महागाई हा सर्वात मोठा मुद्दा आहे. २५ टक्के लोकांनी महागाईचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या नंबरवर २४ टक्के लोकांनी बेरोजगारी असल्याचे म्हटलं. १२ टक्के भ्रष्टाचार, ९ टक्के रस्ते नालेसफाई, ७ टक्के लोकांनी पिण्याचे पाणी मुद्दा असल्याचे म्हटलं. आरोग्य ६ टक्के, शिक्षण ४ टक्के, वीज ३ टक्के आणि कायदा सुव्यवस्थेला २ टक्के लोकांनी मोठा मुद्दा असल्याचे सांगितले.
सध्या हे आकडे मध्य प्रदेश निवडणुकीच्या आधी आले आहेत. मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसं राजकीय आरोप प्रत्यारोपाला रंग येईल. एकीकडे पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत तर दुसरीकडे निवडणूक प्रचारही शिगेला पोहचला आहे. मध्य प्रदेशात भाजपाविरुद्ध काँग्रेस असा थेट मुकाबला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरलेत. आता सर्वांना १७ नोव्हेंबरच्या मतदानाची आणि ३ डिसेंबरच्या निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.