अकोला दिव्य न्युज ब्युरो – अकोला शहरासह जिल्ह्यात थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली असून, गत आठ दिवसांमध्ये किमान तापमानात तब्बल ५ अंशांनी घसरण झाली आहे. ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. ‘ऑक्टोबर हीट’ गत आठ दिवसांपासून ओसरली असून, जिल्ह्याचे किमान तापमान १७ अंशांवर आले आहे. थंडीचे दिवस जवळ येऊ लागल्याने शहरात ऊबदार कपड्यांची मार्केटमध्ये गर्दी वाढत आहे. शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे तापमान १७ अंशांवर होते. वातावरणातील बदलामुळे सर्दी पडसा आणि खोकला आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेषत लहान मुलांना या आजाराचे प्रमाण जास्त आहे. रात्री शहर व गावातील विविध भागात थंडीच्गाया रव्यापासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटविल्या जात आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. जिल्ह्याचे तापमान विदर्भातून सार्वाधिक नोंदविल्या गेले होते. त्यानंतर आता गत आठ दिवसांपासून तापमानात घसरण होत असून, थंडी वाढत आहे. दिवसा उन्हाची तीव्रता कायम असली, तरी रात्रीच्या सुमारास थंडीचा जोर वाढला आहे. जिल्ह्याचा पारासुद्धा ५ अंशांनी घसरला आहे. सध्या रब्बी हंगामाची पेरणीची लगबग सुरू आहे. त्यामुळे सिंचनही वाढले आहे. परिणामी ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. शहरात स्वेटरच्या मार्केटमध्ये गर्दी वाढत असून, जसजसा थंडीचा जोर वाढतो तसतसे सर्दी, पडसा खोकला आणि ताप या व्हआयरल आजाराचे प्रमाण वाढणारच आहे. पण अजूनही गुलाबी थंडी आली नाही.
.