अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिवाळीत प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते नागपूर या स्थानकांदरम्यान २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत द्विसाप्ताहिक सुपरफास्ट गाडी चालविण्यात येणार आहे. अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी ११ अशा एकूण २२ फेऱ्या होणार असून, ही गाडी अकोला स्थानकावर थांबणार असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०१०३३ एलटीटी-नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसपासून दर मंगळवार आणि गुरुवारी २०:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०:२५ वाजता नागपूरला पोहोचेल. ०१०३४ नागपूर-एलटीटी द्विसाप्ताहिक सुपरफास्ट २७ ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत दर बुधवार आणि शुक्रवारी १३:३० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. पूर्णपणे वातानुकुलीत असलेल्या या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा स्थानकांवर थांबा असणार आहे. एक फर्स्ट एसी, दोन एसी-२ टियर, १५ एसी-३ टियर, पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन, अशी या गाडीची संरचना आहे.