Sunday, November 24, 2024
Homeताज्या घडामोडीजनता बॅकेच्या 13 संचालकांच्या निवडीसाठी मतदान 24 जुलैला : अकोल्यात 3 मतदान...

जनता बॅकेच्या 13 संचालकांच्या निवडीसाठी मतदान 24 जुलैला : अकोल्यात 3 मतदान केंद्र

अकोला दिव्य ऑनलाईन : मल्टीस्टेट शेड्युल बॅंक अकोला जनता कमर्शियल को-ऑप बॅंकेच्या वर्ष 2024-2029 या पुढील 5 वर्षांकरीता नवीन संचालक मंडळ निवडीसाठी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काल 20 जुलैला शेवटच्या दिवशी सर्वसाधारण श्रेणीत 14 जणांचे उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने, सर्व साधारण श्रेणीतून संचालक मंडळावर निवडून द्यावयाच्या 13 सदस्यांचा निवडीसाठी बुधवार 24 जुलैला मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यावर सर्वसाधारण श्रेणीत ज्ञानचंद गर्ग, रमाकांत खेतान, अनिल अग्रवाल, महेंद्र गढिया, सुनील तुलशान, विप्लव बाजोरिया, पंकज लदनिया, शैलेंद्र कागलीवाल, संतोष गोळे, डॉ.सुभाष तिवारी, साकरचंद शाह, शिवप्रकाश मंत्री, भरत व्यास आणि आशिष लोहिया निवडणूक रिंगणात कायम राहीले. त्यामुळे मतदान घेणे क्रमप्राप्त असल्याने काल मंगळवार 20 जुलैला सायंकाळी निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया राबविली. निवडणूक रिंगणात असलेल्या 14 उमेदवारांपैकी 13 उमेदवारांनी सामुहिक निवडणूक चिन्ह म्हणून ‘विमान’ (एरोप्लेन) या चिन्हाची मागणी केली होती. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी ती मागणी मंजूर करीत 13 उमेदवारांना ‘विमान’ हे निवडणूक चिन्ह आवंटीत केले. तर एक उमेदवार आशीष लोहिया यांना ‘सिलींग फॅन’ निवडणूक चिन्ह देण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुंभार उपस्थित होते.

निवडणुक कार्यक्रमानुसार मतदान घेणे आवश्यक झाल्याने, आता गुरूवार 24 जुलैला मतदान होणार असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासाठी मतदान केंद्राचे नियोजन केले. अकोला जनता बॅंकेचे एकंदरीत 68 हजार 682 भागधारक मतदार असून, यासाठी 65 मतदान केंद्र सज्ज केले आहेत. अकोला शहरातील न्यु राधाकिसन प्लॉट मधिल अग्रसेन भवन येथे बुथ क्रमांक 1 ते 11 येथे मतदार क्रमांक 1 ते 16 हजार 580 आणि भाटिया वाडी येथील बुथ क्रमांक 12 ते 16 वर मतदार क्रमांक 16 हजार 581 ते 22 हजार 885 आणि वर्धमान भवन येथे बुथ क्रमांक 65 वर मतदार क्रमांक 22 हजार 886 ते 68 हजार 682 या क्रमांकाच्या मतदारांना मतदान करता येणार आहे. मतदान करताना ओळख पत्र असणे आवश्यक आहे.त्याशिवाय मतदान करता येणार नाही.

अकोला शहरासोबतच अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, मुर्तिजापुर तसेच वाशिम जिल्ह्यातील वाशिम शहर, मालेगाव शिरपूर जैन, रिसोड, मंगरुळपीर, मानोरा, शेलू बाजार आणि कारंजा तर यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहर, दिग्रस तसेच अमरावती शहर, चांदूर रेल्वे आणि परतवाडा तर नागपूर शहर आणि बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव, मलकापूर, लोणार यासोबतच छत्रपती संभाजी नगर, नांदेड, परभणी, नाशिक, मुंबई, इंदौर, बुराहणपुर आदीसह एकुण 32 ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!