थाटात समारोप ! ‘ना नफा ना तोटा’ तत्वावरील अशा आयोजनाची गरज – आयुक्त सौम्या शर्मा चांडक

    0
    2

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शिक्षण क्षेत्रातील बदलती आव्हाने, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची गरज आणि पालकांच्या अपेक्षा लक्षात घेता ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर आयोजित होणाऱ्या एज्यु-एक्स्पो सारख्या उपक्रमांची आज समाजाला नितांत आवश्यकता आहे. शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीची अस्सल जाणीव ठेवून एज्यु-एक्स्पोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारा आणि नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित शैक्षणिक महा-एक्स्पो हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक ( IAS) यांनी केले.

    तीन दिवसीय एज्यु-एक्सपो २०२६ च्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आयोजन समिती सदस्य उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक एज्यु एक्स्पो आयोजन समितीचे सदस्य तथा भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर डंबाळे, जया भारती-इंगोले आणि आकांक्षा गोमासे तर आभार प्रदर्शन एज्यु एक्स्पो-2026 आयोजन समितीचे सदस्य तथा प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले.

    • बेस्ट स्टॉल अवॉर्ड प्रदान
      बेस्ट स्टॉल एज्यु एक्स्पो-2026 मध्ये 100 च्या वर स्टॉल मधून नावीन्यपूर्ण मांडणी व उपक्रमशीलता आणि माहितीचे समर्पक सादरीकरण या वैशिष्ट्यांवर आधारित विविध गटातील बेस्ट स्टॉलला मान्यवरांच्या हस्ते बेस्ट स्टॉल अवॉर्ड प्रदान करण्यात आले.
      त्यामध्ये प्लॅटीनम या गटातील आरडीजी महाविद्यालयाचा स्टॉल, बुलडाणा अर्बनचे सहकार विद्या मंदिर, समर्थ पब्लिक स्कूल, जसनागरा पब्लिक स्कूल, डायमंड गटात ललित ट्युटोरियल, सरस्वती इंग्लिश महाविद्यालय, गोल्ड या गटातील स्टॉलमध्ये पोलीस विभागाच्या स्टॉलला आणि मानकर सरांच्या नाणे प्रदर्शनी, सिल्वर गटातील ई-झोन सिप अबॅकस, ब्युल्डींग ब्लॉक्स, ज्योती चेम्पोरियम, ब्राँझ गटामध्ये अकोला एज्युकेशन सोसायटी, उत्कर्ष एन्टरप्राईजेस, एमरॉल्ड हाईट्स स्कूल यांना बेस्ट स्टॉल अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

    • शिक्षणाच्या सर्वच घटकांचा एक्स्पोमधील सहभाग आदर्श निर्माण करणारा – पोलीस अधीक्षक अर्चित चांडक
      शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि विविध शिक्षणपूरक घटक या सर्वांचा एका व्यासपीठावर झालेला सक्रिय सहभाग हा ‘एज्यु-एक्सपो २०२६’चा सर्वांत मोठा विशेष आहे. शिक्षणाच्या सर्व घटकांना परस्पर संवाद, विचारविनिमय आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीची संधी देणारा हा उपक्रम निश्चितच आदर्श निर्माण करणारा आहे, असे प्रतिपादन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शैक्षणिक महा-एक्स्पोच्या समारोपप्रसंगी केले.
    • शिक्षण ही केवळ शाळा-महाविद्यालयांची जबाबदारी नसून विद्यार्थी, पालक आणि समाज या सर्वांच्या सहभागातूनच गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था आकाराला येते, असे त्यांनी नमूद केले.
    • विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे, त्यांच्या कौशल्यांना दिशा देणारे आणि भविष्यातील शैक्षणिक संधींची ओळख करून देणारे असे उपक्रम आजच्या काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
    • एज्यु एक्स्पो-2026 मध्ये युवकांना उपलब्ध झाली रोजगाराची संधी
      अकोला एज्यु एक्स्पोअंतर्गत आयोजित मेगा जॉब फेअर अंतर्गत जवळपास 2 हजार युवकांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 60 पेक्षा जास्त कंपन्यांनी या मेळाव्यामध्ये युवकांच्या मुलाखती व त्यांना असलेल्या संधीबाबत मार्गदर्शन केले.
      अकोला एज्यु एक्स्पोची महत्वाची उपलब्धी म्हणजे या मेगा जॉब फेअरअंतर्गत 400 युवकांना रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या. आजपासून http://www.akolajobs.com या वेबसाईटवर नोंदणी सुरू झाली असून युवकांनी यावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!